Loading

धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व
सोलापूर हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर आहे, ज्याला पंढरपूर, अक्कलकोट, सिद्धेश्वर मंदिर, गाणगापूर आणि भुईकोट किल्ला या ठिकाणांमुळे या जिल्ह्याला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. संत चोखामेळा, संत दामाजी, संत कान्होपात्रा, संत बसवेश्वर असे अनेक संत सोलापूर मध्ये राहिले. म्हणूनच सोलापूरला संतांची भूमी देखील म्हटले जाते.

विविधता
आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणाच्या सीमेवर असल्याने येथे विविध धर्म आणि भाषांचे लोक राहतात. मराठी, कन्नड, तेलगू, तमिळ, हिंदी, गुजराती आणि सिंधी या विविध भाषा बोलल्या जातात. इतकी विविधता असूनही सर्व सण शांततेत साजरे केले जातात.

सोलापूरचा इतिहास
सोलापूर हे नाव ‘सोला’ आणि ‘पूर’ म्हणजे ‘गाव’ या शब्दांपासून बनले आहे, असे मानले जाते. परंतु मोहोळ तालुका आणि भुईकोट किल्ल्यावर सापडलेल्या १३ व्या शतकातील शिलालेखानुसार सोलापूरला सोनलपूर असे संबोधले जात असे. मुघल काळातही याला सोनलपूर म्हणत. कालांतराने ‘न’ हटून सोलपूर आणि अखेरीस सोलापूर झाले असावे
या जिल्ह्यावर एकेकाळी आंध्रबत्त्य, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव आणि बहमनी यांचे राज्य होते. दक्षिणेकडील राज्यांशी संबंध असल्याने येथे अनेक युद्धे झाली. औरंगजेबही येथे अनेक वर्षे राहिला. सोलापुरातील ब्रह्मपुरी येथे राहून त्यांनी दक्षिणेतील लष्करी कारवाया हाताळल्या.

स्वातंत्र्य संग्रामात सोलापूरचे योगदान
इंग्रजांच्या काळातही येथे अनेक चळवळी झाल्या. महात्मा गांधींच्या दांडीयात्रेने प्रेरित होऊन नागरिकांनी सोलापूर नगरपालिकेवर राष्ट्रध्वज फडकवण्याचा निर्णय घेतला. 6 एप्रिल 1930 रोजी पुण्यातील स्वातंत्र्यसैनिक अण्णासाहेब भोपटकर यांनी नगरपालिकेवर राष्ट्रध्वज फडकवला. ही भारतातील पहिली आणि एकमेव घटना होती. सोलापूर ची नगरपालिका (आताची महानगरपालिका) हि भारतातील पहिली नगरपालिका होती जिथे १९३० मध्ये राष्ट्रध्वज फडकवला गेला.

 

हुतात्मा चौक
संतप्त इंग्रजांनी सोलापूर मध्ये मार्शल लॉ जाहीर केला. अनेक निरपराध लोकांना खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आली. स्वतंत्र सैनिक श्री मल्लप्पा धनशेट्टी, श्री कुर्बान हुसेन, श्री जगन्नाथ शिंदे आणि श्री किसन शारदा यांना दोन पोलिसांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. स्वातंत्र्यसैनिकांच्या सन्मानार्थ त्यांच्या पुतळ्यांची स्थापना करून त्या जागेला हुतात्मा चौक असे नाव देण्यात आले.

 

आजोबा गणपती
सोलापूर शहराची आणखी एक ओळख म्हणजे आजोबा गणपती. या गणपतीची स्थापना १८८५ मध्ये झाली. लोकमान्य टिळकांनी १८९३ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. पण त्याआधीही आजोबा गणपतीचा उत्सव सार्वजनिकरित्या साजरा केला जात होता असं सांगितलं जातं. लोकमान्य टिळकांनी सोलापूरच्या आजोबा गणपतीच्या प्रेरणेने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला असे म्हणतात.

सोलापूरचे धार्मिक, ऐतिहासिक, आणि सांस्कृतिक महत्त्व आपल्या मनात विशेष स्थान राखते. विविधता, शांतता, आणि एकता यांचा संगम इथं बघायला मिळतो. सोलापूरकर म्हणून आपल्या शहराच्या गौरवशाली इतिहासाचा आणि सांस्कृतिक वैभवाचा अभिमान आहे.

Proud to be a Solapurkar..